सोनगेवाडीत आंबेडकर जयंती साजरी
कणकवली | मयुर ठाकूर : देशात आर्थिक, राजकीय, सामाजिक समता प्रस्थापित करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रहिताच्या कार्यात देशातील प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे सोनगेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. सर्वगोड बोलत होते. यावेळी कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, महाराष्ट्र राज्याचे संघटक विजय जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, महिला कोषाध्यक्ष दीपाली चांदोस्कर, धनराज जाधव, रामचंद्र जाधव, रोहिणी जाधव, साक्षी खानोलकर, आर. डी. चेंदवणकर, स्नेहा पेंडूरकर, भाई जाधव, सूर्यकांत कदम, नीलेश जाधव, बुधाजी कांबळे, अर्जुन कदम, तानाजी कांबळे, चंद्रकांत म्हापणकर, संजय पारधी आदी उपस्थित होते.
सर्वगोड म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे विचार महान आहेत. त्यांचे विचार तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजेत. जपान देशाचे दरडोई उत्पन्न हे 50 लाख एवढे आहे. भारताचेही दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी प्रत्येक देशवासीयाने प्रयत्न केले पाहिजेत. अमेरिका, चीन, जपान ही प्रगत राष्ट्रे असून या राष्ट्रांप्रमाणे आपला देश प्रगत झाला पाहिजे. देशावर सध्या 5 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, ही बाब शोभनीय नाही. त्यामुळे देशावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासन व प्रशासन पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकरांचे आचार व विचार महान असून देशासाठी त्यांनी अमूल्य कार्य केले आहे. त्यांचा कार्याचा वसा तरुण पिढीने पुढे न्यावा, असे आवाहन युवराज महालिंगे यांनी केले. संजय पारधी, आनंद कासार्डेकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. आरंभी मान्यवरांच्या उपस्थितीत पंचशील धम्म धज्वारोहण व धम्म वंदना करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत आनंद कासार्डेकर यांनी केले. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन संजय पेंडुरकर यांनी केले. या कार्यक्रमाला बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.