सिंधुदुर्ग : राणे साहेब तुमचे दुःख मला पाहवत नाही, आज पर्यंत तुम्ही तिकीटे वाटत होता आता तुम्हाला तिकीटासाठी अनेक दिवस वाट पहावी लागली काय ही परीस्थिती? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी आज येथे केले. दरम्यान कोकणात श्रीमंत लोक राहतात, या ठिकाणी कोणी तरी व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन केले म्हणे, असे सांगत कुठे मधु दंडवते आणि कुठे ही सगळी लोक, अशी खिल्ली त्यांनी राणे आणि केसरकर यांचे नाव न घेता उडविली.
येथील गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, संदीप घारे, डॉ. जयेंद्र परुळेकर, अँड. दिलीप नार्वेकर, रूपेश राऊळ, समीर वंजारी, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, मायकल डिसूजा, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, रमेश गावकर, समीर शेख, विनया बाड, महेंद्र संगेलकर, नंदु पाटील, मोहन जाधव, किशोर वरक, अफरोज राजगुरू, इर्शाद शेख आदी उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मोदी, शहा हे पाच वर्षांचे भाडेकरू आहेत. घर मालकाच्या मनात आले तर ते कधीही त्यांना घराबाहेर काढू शकतात, हे देवेंद्र फडणवीस यांनी ध्यानात घ्यावे.