26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

जाणवली अपघाताची सखोल चौकशी करा ; अ‍ॅड. सुदीप कांबळे यांची पोलिसांकडे मागणी

कणकवली : मुंबई – गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय -लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिल्याने शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. चालक वेदांत शेलार याच्यावर ३०४ कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी केली आहे. कणकवली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अ‍ॅड. कांबळे यांनी योग्य ती कार्यवाही न झाल्यास गुरुवार २५ एप्रिलला कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिले. अपघात प्रकरणाबाबत सोमवार २२ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.
जाधव माय-लेकाच्या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनोज पाटील यांची भेट घेतली.

यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जानवली सरपंच अजित पवार, भाई जाधव, मंगेश पवार, बाळा डागमोडेकर, नागेश पवार, दिपा पवार, सुनिता पवार, प्रतिभा जाधव, सुनिता डागमोडेकर, डॉ. राहुल पवार, प्रियांका पवार, क्रांती पवार, मेघा पवार, श्रद्धा तळवडेकर, प्रज्ञा तळवडेकर यांच्यासह जाधव यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व पोलीस उपस्थित होते.

मंगला यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारसह पसार झालेल्या चालकास फोंडाघाट चेकपोस्ट येथे कार्यरत पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी मनोज पाटील व शरद देठे यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅड. कांबळे म्हणाले, मंगला जाधव या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा खर्च करताना जाधव कुटुंबियांची दमछाक होत आहे. अपघातानंतर पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला नाही. चालकाला अभय मिळेल, अशी कलमे गुन्ह्या दाखल करताना लावण्यात आली आहेत. अपघातापासून आजपर्यंत शरदचंद्र याचा आईचा जबाब पोलिसांनी घेतलेला नाही. सदर कार चालक तोच होता का?, अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज का घेण्यात आले नाही, असे सवाल अ‍ॅड. कांबळे व जाधव यांच्या कुटुंबियांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!