सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे ही कोकणच्या जनतेची अस्मिता आहे. केंद्रातील ती कोकणची ओळख आहे. कोकणच्या विकासासाठी आजवर ते व्रतस्थाप्रमाणे झटले आहेत. आम्हाला नेहमीच कोकणचा अभिमान राहिला आहे. राजकारण हे चालूच राहतं मात्र उबाठाचे नेते ज्याप्रमाणे त्यांच्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. आमच्या कोकणी अस्मितेला हात घालाल तर कोकणी माणूस काय आहे ते पुन्हा एकदा दाखवून देऊ, असा थेट इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उबाठा सेनेला दिला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या इन्सुली येथील मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना ही कोकणी माणसामुळे उभी राहिली. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक जण या संघटनेला जोडले गेले. मात्र त्यांच्या मुलानेच त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांच्या शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधले. ज्या शरद पवारांनी तीन वेळा शिवसेना फोडली त्यांचा
हात धरून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी पत्करली.स्वातंत्र्यवीर सावरकरा विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींना युवराज मिठ्या मारतात. तर पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणाऱ्यांसोबत जवळीक करणारे आज हिंदुत्वाच्या गप्पा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनता त्यांच्या या बेगडी भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत बोलण्याची खरंतर त्यांची पात्रता नाही. ना. राणे यांनी कोकणातील जनतेसाठी आपले जीवन समर्पित केल आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव देखील राणे यांनी घेऊ नये असे आवाहन करतानाच येथील खासदारांचं पार्सल या निवडणुकीनंतर चांगलं स्वच्छ करून मुंबईला पाठविण्याची जबाबदारी आम्ही घेतो त्याची चिंता तुम्ही करू नका, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.