21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

34 वर्षांत राणेंनी सिंधुदुर्गात दहशतीचे राजकारण केले | युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे टीकास्त्र

कणकवली | मयुर ठाकूर : शेवटचे इलेक्शन म्हणत आता भावनिक साद घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि राणे कुटुंबाकडून प्रचारादरम्यान होईल. मागील 34 वर्षांत राणेंनी सिंधुदुर्गात दहशतीचे राजकारण केले. राजकीय विरोधकांच्या निर्घृण हत्या करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केल्याची टीका कै. श्रीधर नाईक यांचे चिरंजीव युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.

सुशांत नाईक म्हणाले की, मागील 34 वर्षांत सिंधुदुर्गचा विकास राणेंनी का केला नाही ? आता विकासाच्या वलग्ना करत फसवी आश्वासने देऊन जनतेला भावनिक हाक घालण्याचा डाव राणे आखतील. लोकसभेला नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली. कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले त्यांचे पुत्र नीतेश राणे हे आमदारकीला उभे राहतील. तर कुडाळ मालवण मतदारसंघातून त्यांचा मोठा मुलगा नीलेश राणे उमेदवारी मागत आहे. वडील खासदारकीला आणि दोन्ही मुलगे विधानसभेला उभे राहतील. आज दोन्ही मुलगे आमदारकी मागताहेत उद्या राणेंचे नातू मागतील. केवळ मी आणि माझ्या कुटुंबालाच सगळे हवे असे म्हणणाऱ्या नारायण राणे आणि राणे कुटुंबाला भसम्या रोग झाला आहे. हाच भसम्या रोग राणेंच्या राजकीय जीवनाचा अंत करणार असल्याची टीका नाईक यांनी केली. भाजपाच्या कुवत असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केवळ राणेंच्या सतरंज्या उचलत राहायचे काय ? असा सवालही नाईक यांनी केला. अशा वेळी ज्या राणेंनी केवळ दहशत करून राजवट केली ते राणे जर आता लोकसभेला निवडून आले तर किती दहशतवाद निर्माण करतील ? याचा विचार रत्नागिरी व सिंधुदुर्गातील जनतेने करणे आता गरजेचे आहे.जशी दहशत राणेंनी पसरवली होती तशीच दहशत कणकवली, देवगडमध्ये पसरवण्याचा प्रयत्न नीतेश राणे यांनी केला होता. स्वतःच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जाळल्या. प्रतिष्ठित वकिलांच्या गाड्या जाळल्या. जर गाड्यांना लागलेली ही आग वकिलांच्या घराला लागली असती आणि त्यांच्या कुटुंबियांना हानी पोचली असती तर त्याला जबाबदार कोण राहिले असते ? हा प्रश्न आहे. जर पुन्हा सिंधुदुर्गात राणे कुटुंबाचे वर्चस्व निर्माण झाले तर जिल्ह्यात राणेंचा पुन्हा दहशतवाद आणि माज बघायला मिळणार आहे. 2014 च्या निवडणुकीत राणेंनी परमेश्वर आला तरी माझा पराभव करू शकणार नाही असे म्हटले होते. तेव्हा सिंधुदुर्गातील जनता जनार्दनाने राणेंना तोंडावर पाडून पराभूत केले होते. आमच्या दृष्टीने जनता हीच परमेश्वर आहे. राणेंसारख्या वाईट प्रवृत्तीची सुरुवात जरी चांगली झाली तरी त्याचा शेवट हा नेहमीच वाईट असतो, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!