3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

कणकवलीत राममय वातावरण | राम जन्मोत्सव सोहळा पहावयास रामभक्तांची मंदिरांमध्ये गर्दी…!

कणकवली – कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवामुळे सर्वत्र राममय वातावरण होते. ठिकठिकाणी पार पडलेला राम जन्मोत्सव सोहळा रामभक्तांनी ‘याची डोळा, याची देही’ पाहता अनुभवला. तालुक्यात राम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

शहरासह तालुक्यातील हळवल,पिसेकामते,वरवडे,कलमठ, बीडवाडी यासह अन्य गावांमध्ये राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. राम नवमीनिमित्त शहरातील श्री देव काशिविश्वश्वेर मंदिरात गेले काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बुधवारी सकाळी श्रींची पूजा, अभिषेक हे विधी पार पडले. त्यानंतर श्री राम जन्मोत्सवावर कीर्तन पार पडले.

दुपारच्या सत्रात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. राम जन्मला सखे राम जन्मला यासह अन्य अशी अंगाई गिते म्हटली गेली.जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. त्यानंतर आरती,मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी श्री देव काशिविश्वश्वेर मंदिर देवस्थान समितीचे पदाधिकारी,सदस्य, गावपुरुष, मानकरी, यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.

जन्मोत्सव सोहळ्यानंतर भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा महापौराणिक प्रयोग सादर झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री दैनंदिन आरती पार पडली, रात्री मंदिर परिसरात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील हनुमान मंदिर, प.पू.चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमासह तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजारा करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!