मार्केट यार्ड उभं होतंय याचा आम्हाला सार्थ अभिमान : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची उत्पादन क्षमता वाढवा, जनतेचा दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी साथ द्या : खा. नारायण राणे
खासदार नारायण राणेंची जिल्हा विकासाची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील : आ. दीपक केसरकर
मार्केट यार्ड च्या माध्यमातून पारदर्शक कारभार व्हावा : आ. निलेश राणे
कणकवली : कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदगाव वाघेरी येथे हे मार्केट यार्ड म्हणजे आमच्या महायुती सरकारच्या या कारकिर्दीतील पहिले मार्केटयार्ड आहे. येथील आंबा हा लोकयुक्त आंबा आहे. येथील आंब्यासाठी जीआय मानांकनासहीत ‘युआयडी’ कोडही देण्याची व्यवस्था करू. शेतकऱ्यांचा उत्पादीत माल या मार्केट कमिटीत यावा व त्यानुसार भाव मिळावा, यासाठी मार्केट कमिटी महत्वपुर्ण आहे. यासाठी येथील व्यापारी हे मार्केट कमिटीची परवानाधारक व्यापारी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच हे मार्केट यार्ड व्हावे यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे गेल्या २५ वर्षांचे प्रयत्न होते. ते काम आता होत आहे, याचा आनंद असून आपण ठामपणे आपल्या पाठीशी आहोत. १८ महिन्यानंतर या मार्केटयार्डच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ, असे प्रतिपादन पणन व राजशिष्ठाचारमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
सिंधुदुर्गमध्ये मंजूर ३७० कोटींच्या काजू बोंडू प्रक्रिया प्रकल्पाला चालना देण्याचे काम आम्ही केले असून पुढील काळात काजूसाठी छोटे प्रकल्प, कोल्ड स्टोअरेज आदींसाठी एशियन बँकेकडून २ हजार कोटी मिळणार असून त्याचा जास्तीत जास्त वापर जिल्हयासाठी व्हावा, अशी पेक्षाही श्री. रावल यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नादंगाव-वाघेरी येथील मार्केट यार्डच्या भूमिपूजनप्रसंगी श्री. रावल बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नीतेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी आमदार अॅङ अजित गोगटे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, पणन मंडळ पुणेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सरपंच अनुजा रावराणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, मनोज रावराणे, संतोष कानडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, दिलीप तळेकर, संदीप मेस्त्री, अजय रावराणे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड हे शेतकऱ्यांसाठीचे एक केंद्रबिंदु आहे. तसेच ओरोस, कुडाळ येथे शक्य असेल तेथे उपकेंद्रही सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. या मार्केटयार्डसाठी ५.६६ कोटी सिंधुरत्नमधून मंजूर आहेत. परंतु, त्याच्या ७५ टक्के मिळणार आहेत. बाजार समितीचे सभापती आपल्याशी बोलले. उर्वरीत २५ टक्के रक्कम कुठून आणायची हा प्रश्न सभापती रावराणे यांच्यासमोर होता. त्यांनी आपणाला तो बोलून दाखविला. आपण अॅग्रीकल्चर मार्केटींग इंन्फ्रास्टकचरच्या माध्यमातून १ कोटी देतो. तसेच उर्वरीत रक्कम डीपीडीसीतून द्यावी, लागेल, असेही ते म्हणाले.
येथील आंबा लोहयुक्त आंबा आहे. दुबईचे प्रिंस नुकतेच दौऱ्यावर आलेले त्यावेळी याबाबत आमची चर्चा झाली. त्यावेळी या आंब्यावर विशेष चर्चा झाली. १२ ते १६ तासांत हा आंबा शेतातून दुबईपर्यंत जाण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. आपला येथील आंबा जगाच्या बाजारात जावा. त्यासाठी या आंबला जीआय मानांकनासही युआयडी कोड देण्याची व्यवस्था करू. तसेच येथील मार्केट यार्डसाठी ३० लाख रुपये खर्च करून जगभरात विविध कृषी उत्पादनांना असलेला भाव डिस्प्ले करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आंबा मोहोत्सवासाठी १ लाख रुपयेही आम्ही देणार आहोत. कोल्ट ट्रक उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही होणार आहे.
पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग मध्ये मार्केट यार्ड व्हावे हे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचे स्वप्न होते. त्यांच्या इच्छाशक्तीतून प्रेरणा घेऊन आज या मार्केट यार्डचे भूमिपूजन होत आहे. ही वास्तु आपल्या जिल्ह्यातील शेतकरी, काजू, आंबा बागायतदार यांच्यासहित मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत आपण या जिल्ह्यात मार्केट यार्डचे भूमिपूजन करतो याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. या मार्केट यार्डसाठी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सिंधूरत्नचे अध्यक्ष, आमदार दीपक केसरकर यांचाही मोलाचा हातभार लागलेला आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दलालांच्या रॅकेटकडून आंबा बागायदारांवर अन्याय होत होता. याबाबत सातत्याने आपण व नीलेश राणे बोलत होतो. पण आंबा, काजूला योग्य दर मिळत नसल्याने त्यावर मात करण्याच्या दृष्टीने आपणच शेतकऱ्यांसाठी योग्य मान सन्मान मिळवून देण्याचे आम्ही ठरविले आणि त्यातूनच हे मार्केट यार्ड साकारत आहे. या मार्केट यार्डच्या माध्यमातून कोणतीही तडजोड न होता पारदर्शक काम करण्याची ग्वाही आपण देतो. हे मार्केट यार्ड जिल्हा विकासाचे महत्त्वाचे स्थान बनेल. तसेच बाहेरून येणारा काजू कमी व्हावा, त्यावर आयात कर लावण्यात यावा, यासाठी खासदार नारायण राणेंचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून स्थानिक काजूचे महत्व वाढेल. तर परप्रांतातील आंबा सिंधुदुर्गात आणून देवगड हापूस म्हणून जर विक्री होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
वैभववाडी कोल्हापूर हा रेल्वे मार्ग लवकरच सुरू करणार आहोत. आंबा ,काजू, कोकम पासून लोणचे,पापडापर्यंत चे सर्व प्रक्रिया उद्योग येथे आणणार आहोत.तसे प्रयत्न आमचे आहोत. जनतेने साथ द्यावी.शेती करा उपन्न वाढावा त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल. शेवगा, फणस यांचे आयुर्वेदात फार महत्व आहे. त्यावर प्रक्रिया करा. फणसाच्या बियाची पावडर करून डायबिटीस वर औषध बनवले जाते . शेवगा आयुर्वेदिक औषध आहे. गवती चहावर संसार चालतात, कोकणातील प्रत्येक उत्पादनाला महत्व आहे. इथल्याच उत्पादनांवर येथेच प्रक्रिया करा.इथेच मार्केटिंग तुम्ही करून उत्पादने राज्यात देशात आणि परदेशात पाठवा. तेव्हाच येथील प्रत्येक कुटुंबाचे,प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढेल. असा विश्वास माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
खा. नारायण राणे म्हणाले, जगात विविध वस्तूंवर प्रक्रिया करणारे देश आज प्रगतीच्या शिखरावर आहेत. तुम्ही सुध्दा अशाच प्रयत्न करा. शेती उत्पन्न वाढवा. वेगवेगळी झाडे लावा. त्यांचे उत्पादन घ्या. दरडोई उत्पन्न जेव्हा तुमचे वाढेल त्यावेळी कुटुंब सुखी होईल. आजही मी स्वतःला साहेब मानत नाही. मी जनतेचा सेवक आहे. दिवस रात्र १४ तास काम करतो. कारण माझ्या जिल्ह्यातील जनता सुखी समृद्ध झाली पाहिजे.म्हणून प्रयत्न करतो. आता माझ्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुल जनतेसाठी काम करत आहे.” जे पेरत ते उगवत”. असे सांगताना मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे करत असलेला कामाबद्दल खासदार नारायण राणे यांनी अभिमान व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा विकसित होईल. आंबा काजू कोकम आणि इतर पीक शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे. पिकाला चांगला दर मिळावा आणि त्यासाठी उत्पादन आणि विक्री यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मार्केट यार्डची ही व्यवस्था आहे, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि सभापती तुळशीदार रावराणे यांचे खासदार राणेंनी केले कौतुक