प्रकाश बिडवलकर अपहरण प्रकरणावर वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील प्रकाश बिडवलकर हे मार्च २०२३ पासून बेपत्ता असून त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धेश अशोक शिरसाट (वय ४४ रा. पानबाजार कुडाळ) यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. खरतर दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली असून सिद्धेश शिरसाट हे अचानक दोन वर्षांपूर्वीच राजकारणात आले होते. सत्ताधारी पक्षासोबत त्यांनी काम करून लोकसभा आणि निलेश राणेंच्या निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग होता या दोन वर्षात अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर लावण्यात आले होते. मात्र आज दोन वर्षानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांबरोबर त्यांचे बिनसल्यामुळे हे प्रकरण बाहेर काढण्यात आले परंतु दोन वर्षे सिद्धेश शिरसाट यांना वाचविण्यासाठी, लपविण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
वैभव नाईक पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी, आमदार, खासदार यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे दोन वर्षे या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यात कोणाचा वरदहस्त होता याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. अपहरण प्रकरणात व्हिडिओ करण्यात आले होते अशी दबक्या आवाजात त्यावेळी चर्चा होती. त्यातील एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती मिळाला आहे अशी आम्हाला माहिती आहे. असे अनेक व्हिडिओ आहेत अशी देखील कुडाळ शहरांमध्ये चर्चा असून त्या सर्व व्हिडिओंचा शोध घेतला पाहिजे.आणि प्रकाश बिडवलकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बिडवलकर कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. आरोपींना पळविण्यासाठी, पुरावे लपविण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे नाहीतर शिवसेना या विषयामध्ये रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाही असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.