सावंतवाडी / बांदा : महिलेशी अश्लील वर्तन करून तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात निगुडे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉबर्ट विल्सन फर्नांडिस (वय ३२, रा. तेलीवाडी ) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज इन्सुली-धुरीवाडी येथे घडली. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली-धुरीवाडी येथे मगर पॉईंट आहे. त्या पॉईंट कडे जाण्यासाठी परवानगी घ्यावी, असा फलक जमीन मालकाने त्या ठिकाणी लावलेला आहे. आज दुपारी संशयित रॉबर्ट हा मोटरसायकल वरून मगर पाॅईटच्या जवळ आला व फिर्यादीच्या लहान मुलीच्या अंगावर मोटरसायकल घालून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणाचीही परवानगी न घेता तो मगर पॉईंट जवळ गेला.
याबाबत फिर्यादी महिलेच्या दिराने त्याला विचारणा केली असता त्याने दादागिरी ची भाषा केली. तसेच फिर्यादीशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. संबधित संशयित आज दुपारी पुन्हा मगर पॉईंट जवळ आला व फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. यावेळी तिच्या नवरा विचारणा करण्यासाठी आला असता त्याला मारहाण केली. संशयित हा चारचाकी गाडी घेऊन आला होता. त्याच्या समवेत अन्य दोघेजण होते. आज सायंकाळी महिलेने रॉबर्ट विरोधात बांदा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार बांदा पोलिसात विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.