कणकवली : शहरातील तेली आळी डीपी रोड वरील जय भवानी हे मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले. यात आतील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये असलेले रोख ४५ हजार रूपये लंपास झाले आहेत. ही घटना २५ फेब्रुवारी रात्री सव्वा नऊ ते २६ फेब्रुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरी प्रकरणी मोबाईल दुकान मालक शांतीलाल पदमानी यांनी आज कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शांतीलाल यांचे तेलीआळी डीपी रस्त्यालगत मोबाईल विक्रीचे दुकान आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता ते दुकान बंद करून घेऊन घरी गेले होते. २६ रोजी सकाळी साडे आठ वाजता ते दुकानात आले असता, दुकानाचे कुलूप तोडलेले तसेच शटर अर्धवट स्थितीत उघडे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता टेबलच्या ड्राव्हरमधील ४५ हजार रूपयांची रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. दुकानातील मोबाईल व इतर साहित्य त्यांनी आपल्यासोबत नेले होते. त्यामुळे रोख रक्कम वगळता अन्य वस्तूची चोरी झाली नव्हती.