दोडामार्ग : कळणे-सडा येथे पहाटेच्या सुमारास काजू बागायतीतील शेत मांगराला अज्ञाताने आग लावल्यामुळे लक्ष्मण देसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागात काही दलाल मंडळी जमीन हेरून ती परप्रांतीयांना विकत आहेत. जमीन सर्वे करायला सोपे जावे त्यामुळे या भागात आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत पण आपला मांगर हा अशात कुणीतरी अज्ञाताने पेटून दिला आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी कळणे-भिकेकोनाळ सरपंच अजित देसाई तसेच शेतकरी संघटना अध्यक्ष देसाई तसेच दोडामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मांगर जाळून नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. याबाबत दोडामार्ग पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.