महसूल प्रशासनाकडून करण्यात आले पंचनामे
कणकवली : कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरीला शॉर्टसर्कीटने आग लागली. या आगीत आरबी बेकरीसह काजूचे दुकान, भाजीचे दुकान, बर्डे मेडिकल, चहाचा स्टॉल यांचे मिळून ८३,८०,००० रू. चे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच, आ. नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट दिली. व तातडीने घटनेचे पंचनामे करण्याची सुचना केली. त्यानुसार ग्राम. महसुल अधिकारी यांनी आगीत जळालेल्या दुकानांचे पंचनामे केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल शुक्रवारी पहाटे ४ वा.च्या सुमारास शहरातील आरबी बेकरीला शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. यामध्ये एकूण पाच दुकानांचे मिळून लाखोंचे नुकसान झाले. एैन दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी दुकाने जळून अक्षरश: बेचिराख झाली होती. यामध्ये आरबी बेकरी चे मालक रजिव्रन केडीयन बालकृष्ण यांच्या बेकरीचे ८ फ्रीज, बेकरी सामान, काऊंटर, फर्निचर साहित्य, एक जनरेटर, इलेक्ट्रीक साहित्य, मालक खरेदी व विक्रीची बिले असे मिळून ५७,२५,०००/-रू. चे नुकसान झाले. हर्षल गवाणकर यांच्या दुकानाचे एक फ्रिज, एसी १ एअर कंडिशन, वजन काटे २, फर्निचर, टीव्ही टेलिव्हीजन, लाकडी काऊंटर, इन्व्हरटर बॅटरी, स्लायडींग बिले व इतर कागदपत्र असे मिळून २,६०,०००/- चे नुकसान झाले. तर बाळासाहेब पाटील यांच्या भाजीपाल्याचे पत्र्याच्या स्टॉलमध्ये भाजीचे दुकान होते. यात भोपळ्याचा माल, पत्र्याची शेड, लाकडी बाकडे असे मिळून ७०,०००/-रू. चे नुकसान झाले. तसेच सौरभ बर्डे यांचे मेडिकल जळून मेडिकलचे सामान, फर्निचर, दोन कॉम्प्युटर, एक प्रिंटर, दोन बारकोड प्रिंटर, एअर कंडिशन एसी असे मिळून २३,००,०००/-रू.चे नुकसान झाले. त्याचप्रमाणे सखाराम गाडगे यांचा चहाचा स्टॉलवरील छप्पर व चहाच्या दुकानाचे साहित्य जळून २५,०००/- रू. चे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, राजू गवाणकर, बेकरी मालक रजिव्रन केडीयन बालकृष्ण, मेडिकलचे मालक सौरभ बाबुराव बर्डे, राजा पाटकर, जावेद शेख, अजय गांगण, विराज भोसले, अभय राणे, नवराज झेमणे, इम्रान शेख आदी घटनास्थळी मदतकार्यासाठी दाखल झाले होते.
जेव्हा आगीने पेट घेतला तेव्हा तातडीने नगरपंचायतीच्या बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने एका बंबाने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. म्हणून कुडाळ एमआयडीसी व मालवण नगरपंचायतीचा बंब बोलविण्यात आला. व आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
आवश्यक उपाययोजना निश्चितपणे केल्या जातील – आ.नितेश राणे
सदरच्या घटनेची माहिती मिळताच आ.नितेश राणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व आगीत नुकसान झालेल्या दुकानांची पहाणी केली. यावेळी ते म्हणाले, भविष्यात अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून ज्याकाही आवश्यक असलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्या निश्चितपणे केल्या जातील. त्या दुकानदारांची फार मोठी एैन दिवाळीत हानी झाली आहे. त्याचे दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया आ.नितेश राणे यांनी दिली.