आमदार वैभव नाईकांची मागणी; पोलीस अधीक्षकांना दिले पत्र…
कुडाळ : आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. राजकोट येथे झालेल्या राड्या दरम्यान मला व माझ्या सहकाऱ्यांना एकेकाला रात्रभर घरात खेचून मारून टाकेल, अशी धमकी राणे यांनी दिली. या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याचा दाखला देत श्री. नाईक यांनी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना पत्र दिले आहे. यात आपण २८ तारखेला मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली. या आधी सुद्धा माझे काका कै. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. तेव्हा नारायण राणे हे तेरावे आरोपी होते, तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.