8.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

मालवणात बरसती रंगसरी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : संगीत, नृत्य, अभिनय याद्वारे एका पेक्षा एक बहारदार कलाविष्कार सादर करीत मालवण येथील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झालेल्या बरसती रंगसरी या कार्यक्रमात “पूर्वीचा ते आताचा आपला मालवण” असा मालवणचा प्रवास उभा करण्यात आला. कलाविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मालवण, बोट सेवा, मच्छिमार समाज, मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा, दिवाळी पालखी सोहळा, गणेशोत्सव, दशावतार आदी मालवणचे अनेक पैलू या कार्यक्रमातून मांडण्यात आले. मालवणच्या या ऐतिहासिक प्रवासाच्या रंगसरीत रसिक प्रेक्षक चिंब भिजून गेले.

अ.भा. मराठी नाटय परिषद शाखा मालवण व नगर वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार सायंकाळी मामा वरेरकर नाटयगृह येथे ‘बरसती रंगसरी ६’ हा दिमाखदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये “पूर्वीचा ते आत्ताचा आपला मालवण या विषयावर तीन तासांचा भरगच्च असा धमाल विनोदी मालवणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. सुरूवातीला नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, कार्यवाह संजय शिंदे, सदस्य भालचंद्र केळुसकर आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व नटराज पुजन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला भालचंद्र केळूसकर व सहकारी यांनी नांदी व बरसती रंगसरी या कार्यक्रमाचे शीर्षक गीत सादर करून रसिकांच्या, टाळ्या मिळवल्या. त्यानंतर गणेश वंदना सादर करून जुना ते आत्ताच्या मालवणचा धमाल प्रवास सुरु झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची मालवण भेट व सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी हा ऐतिहासिक प्रसंग सादर करण्यात आला. या प्रसंगामध्ये बहारदार कोळी नृत्यही सादर करण्यात आले. त्यानंतर पूर्वीच्या काळी मालवणमध्ये रोहिणी व सरिता या दोन बोटी गोवा ते मुंबई प्रवासादरम्यान येत होत्या. त्याकाळी मालवणच्या धक्क्यावरती एक हॉटेल होते, त्याचा एक धमाल प्रसंग सादर करण्यात आला. त्यावेळी रसिक प्रेक्षक हास्य कल्लोळात बुडाले.

त्यानंतर मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या “याद तुझी येता माका” या मालवणी गाण्यावर नृत्य सादर झाले. मालवणमधील सण व उत्सवांचा उल्लेख होताना ऐतिहासिक नारळी पौर्णिमेची माहिती देताना एक नारळी पौर्णिमा नृत्य सादर करण्यात आले. नंतर धमाल विनोदी गणेश चतुर्थी स्किट मध्ये सिंधुकन्या गृप यांची फुगडी व बुवा भालचंद्र केळुसकर यांच्या भजनामुळे पारंपारीक लोककलांचे दर्शन घडले. मालवणमधील दसरा, ऐतिहासिक दिवाळी पालखी व टिपर या सणांची माहिती देताना दशावतारी नाटकांच्या परंपरांचा उल्लेख करण्यात आला आणि श्री रामेश्वर वराठी दशावतार नाट्य मंडळ वायरी मालवणचे मालक उमेश परूळेकर यांच्या दणदणीत श्री गणेश भक्ती महिमा या दशावतारी नाट्य प्रवेशाने रसिकांची मने जिंकली. त्यानंतर मालवणातील नररत्नांचा उल्लेख करताना होरारत्न वसंतराव म्हापणकर, मामा वरेरकर, जयंत साळगांवकर व मच्छिंद्र कांबळी यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यसैनिक वामन विष्णु कवटकर, शंकर कृष्णाजी गवाणकर, कृष्णाजी कान्होबा लुडबे, बाळकृष्ण शिवराम लुडबे, प्रभाकर विश्राम रेगे, दत्ताराम भाऊ कोयंडे व श्याम कोचरेकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता जयोस्तुस्ते श्री महन्मगले व ने मजसी ने परत मातृभूमीला या स्वातंत्रवीर सावरकरांच्या गीताने करण्यात आली. या गीतांचे सादरीकरण भालचंद्र केळुसकर व मंडळी यांनी केले.

कार्यक्रमात सादर झालेल्या स्किटचे दिग्दर्शन गणेश मेस्त्री यांनी केले तर नृत्य दिग्दर्शन शुभदा टिकम, सिध्देश पालव, रिना मराळ व संकेत हसोळकर यांनी केले तर कार्यक्रमाची संहिता लेखन अरविंद म्हापणकर, सादर झालेल्या सर्व स्किटचे लेखन, रंगभूषा व वेशभूषा जितू तिरोडकर यांनी केली. एलईडी लाईट व्यवस्था दिनेश आंगणे, रंगमंच व्यवस्था सुभाष कुमठेकर, उमेश परूळेकर, फ्रान्सिस शिरवलकर, समीर शिंदे, प्रकाश योजना धनश्री कुमठेकर यांनी पाहिली. रांगोळी पार्थ मेस्त्री यांनी काढली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मालवणी भाषेतून संजय शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!