मुंबई : कोकणात झालेला पराजय हा अनाकलनीय आणि क्लेशदायक आहे. कोकणी जनतेला शिवसेनेपासून कोणी तोडू शकेल असे मला वाटत नाही, मात्र यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे, असा संशय ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडी म्हणून आम्ही उद्या दावा करणार आहोत. पंतप्रधान पदाचा नेता कोण असेल हे उद्याच्यात बैठकीत ठरेल. मात्र काहिही झाले तरी हुकूमशाहीला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकिच्या निकालानंतर श्री. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. ते म्हणाले, मला संपवण्याचा प्रयत्न झाला चिन्ह बदलले, पक्ष गेला तरी ही केवळ मतदारांनी विश्वास ठेवल्यामुळे मशाल घेऊन आत्मविश्वासाने उभा राहिलो. या ठिकाणी लोकसभेत ४८ जागा येतील असा आत्मविश्वास होता, मात्र काही जागा हातातून निसटल्या तर अमोल किर्तीकर यांच्या जागेबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत, असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात हुकूमशाहीला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी म्हणून सर्व एकत्र येणार आहोत. पंतप्रधान पदाचा उमेदवार नेमका कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. मात्र एकत्र येऊन आम्ही हा निर्णय घेणार आहोत. काही झाले तरी लोकशाही संपवणारे पुन्हा सत्तेत नको, असा विचार करून आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत असे ते म्हणाले.