कुडाळ : ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी एक प्रचलित म्हण आहे. आपल्याकडे अनुकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुण आपल्यातील अंगगुणाना हवा तसा वाव देत नाहीत. उलटपक्षी व्यवस्थेला दोष देत तक्रारीच्या मूडमध्ये दिसतात. मात्र, हरी परबसारखी चित्रकार मंडळी दिव्यांग असूनही प्रतिकूल परिस्थितीत आपले छंद जोपासतात. त्यांच्या या जिद्दीला खरेतर सलाम केला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
माणगाव खोऱ्यातील भोयाचे केरवडे गावचे तरुण चित्रकार आणि वस्तू संग्राहक यांनी भरविलेल्या जुन्या काळात वापरात असलेल्या अनेक घरगुती वस्तूंचे प्रदर्शन कुडाळ येथे सुरू आहे. प्रभाकर सावंत यांनी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांच्यासह आज या प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
पेशाने चित्रकार असलेल्या आणि त्या कलेत पारंगत असलेल्या हरी परब याला दुर्दैवाने तरुण वयातच शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागले. काही गोष्टींचे निमित्त होऊन त्याची दृष्टी अधू झाली, खूप उपचारांनंतरही व्यवस्थित दिसणे शक्य झाले नाही. त्यामुळे चित्रकला या विषयात पुढे काही करणे त्याला शक्य झाले नाही. तरीही जिद्द न सोडता त्यांनी जुन्या काळात प्रत्येकाच्या घरात सर्रास वापरात असलेल्या आणि आता कालबाह्य झालेल्या वस्तू जमविणे सुरू केले. अश्या अनेक वस्तूंचा संग्रह त्याच्याकडे आहे. याच वस्तूंचे प्रदर्शन त्यांनी कुडाळ येथील ग्रंथालयाच्या सभागृहात सुरू केलेले होते. आज भाजपा पदाधिकारी यांनी प्रदर्शनाला भेट देत त्याचे कौतुक केले. रणजित देसाई यांनी त्याला थोडी आर्थिक मदत केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच्या या छंदासाठी भारतीय जनता पार्टी, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत कोणतीही मदत करण्याचे आश्वासन दिले.