कुठेय बंदी..! जिल्ह्यात गुटखा विक्रीला मोठी संधी
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : महाराष्ट्रात गुटखाबंदी करण्यात आली आहे. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केले आहे. गुजरात आणि कर्नाटक भागातील उत्पादकांकडून येणारा अवैध गुटखा किरकोळ तसेच घाऊक विक्रेत्यांकडे येत आहे. हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे जिल्ह्यात राजरोसपणे त्याची विक्री सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली, तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. पानाच्या टपऱ्या तसेच काही किराणा दुकानांतून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा विकला जातो.
काही दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यातील खारेपाटण, कासार्डे याठिकाणी कारवाई करून गुटखा जप्त करण्यात आला होता. गुटख्याच्या साठा करणाऱ्या संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अन्य ठिकाणी गुटखा विक्री सुरू असताना कारवाईत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेकवेळा जुजबी कारवाई करून गुटखा विक्रेते आणि उत्पादकांमध्ये दहशत निर्माण केली जाते. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने अवैधरीत्या गुटखा विक्री सुरूच राहते.
त्यामुळे गुटखाबंदीचा आदेश नावापुरताच आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस तसेच अन्न व औषधी विभागातील काहींच्या छुप्या पाठिंब्यावरच गुटखा विक्रीचे जाळे निर्माण झाले असल्याची चर्चा नागरिकांमधून अनेक वेळा ऐकायला मिळते. ही चर्चा थांबण्यासाठी पोलिस तसेच अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने वेळोवेळी कारवाई केली पाहिजे.
तरुण व्यसनांच्या आहार
अनधिकृतरीत्या गुटखा विक्री करणाऱ्याऱ्यांची चांदी होत असली तरी तरुणवर्ग मात्र मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात आहे. गुटखाबंदीचा कायदा करून सरकारने गुटखा विक्री तसेच उत्पादन व वाहतूक यावर निर्बंध लादले. कायदा न मोडता तो पद्धतशीरपणे वाकविण्याची वृत्ती असलेल्या महाभागांनी सुपारी व तंबाखू, अशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने तोही हाणून पाडत अशा प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन होणे आवश्यक आहे.