12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

धोकादायक वळणावर रिक्षा – स्कार्पिओ मध्ये अपघात | एक ठार : एक गंभीर जखमी

देवगड : देवगड नांदगाव मार्गावर कट्टा तिथे नजीक धोकादायक वळणावर स्कार्पिओ आणि रिक्षाची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील प्रवासी राजेश विष्णू शेडगे वय ५० राहणार कट्टा भंडारवाडी हे जागीच ठार झाले. या अपघातात रिक्षाचालक अक्षय विवेकानंद कीर वय २७ राहणार कट्टा हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरेरी येथून राजेश भाऊसाहेब कदम (३३)रा. जुना पनवेल हा स्कार्पिओ गाडी घेऊन देवगडच्या दिशेने जात होता. या गाडीमध्ये वरेरी येथील मंगेश सावंत यांचे मेव्हणे संजय सोलकर व त्यांचे भांडुप मधील दोन मित्र तसेच सावंत यांची दोन मुले व मुंबईहून वरेरी येथे आलेली दोन मुले यांना घेऊन देवगड बीच येथे फिरण्यासाठी जात होते. दरम्यान कट्टा येथील रिक्षाचालक अक्षय विवेक किर हे देवगड येथून आपल्या मालकीची रिक्षा घेऊन कट्टा येत होते. त्यावेळी त्यांच्या रिक्षेमध्ये कट्टा भंडारवाडा येतील राजेश विष्णू शेडगे वय ५० त्यांच्या मुलगा श्लोक राजेश शेडगे वय ११ त्यांच्या मित्र आदेश नागेश करंगुटकर वय १२ हे प्रवास करत होते.

राजेश शेडगे हे रविवारीच मुंबई हून कट्टा गावी कुटुंबीयासमवेत १७ मे रोजी वार्षिक गोंधळ असल्याने कार्यक्रमासाठी आले होते. देवगड मध्ये ते साहित्य खरेदीसाठी गेले होते. साहित्य खरेदी करून झाल्यानंतर गावातीलच अक्षय किर याच्या रिक्षेने मुलगा व त्यांच्या मित्र यांच्या समवेत घरी कट्टा येथे येत होते.

देवगडून कट्टा येथे रिक्षेने घरी परतत असतानाच वरेरी येथून भरधावं वेगाने येणार्‍या स्कार्पिओ चालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा व स्कार्पियो गाडी रस्त्यांच्या एका बाजूला गडग्यावर जाऊन धडकली .तर रिक्षा पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन रिक्षातील प्रवासी शेडगे यांच्या अंगावर आदळली. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजतात त्या घटनेदरम्यान तेथून दुचाकीने प्रवास करणारे कट्टा येथीलच रमेश प्रभू यांनी घटनास्थळी थांबले व अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल कट्टा ग्रामस्था समवेत प्रभू यांनी मदत कार्य राबविले. अपघातग्रस्त रिक्षांमधील जखमी प्रवाशांना बाजूला करून तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. देवगड पोलीस स्टेशनला कळविताच देवगड पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सावंत, महेंद्र महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल वैजल, भाऊ नाटेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

अपघातग्रस्त स्कार्पिओ मधील चालक राजेश कदम गाडीतून बाहेर पडून देवगडकडे जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याला रस्ता माहिती नसल्यामुळे तो उलट दिशेने घाडणीचे पाणी या ठिकाणी गेला. तर स्कार्पिओ मधील वरेरी येथील मंगेश सावंत यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली. मंगेश सावंत यांचे मेव्हणे सोलकर हे दोन मित्रांसमवेत दोन मुलांना घेऊन शनिवारी वरेरी येथे पनवेल कोंडगाव येथील जेरीन डेव्हिड कल्लू प्ररंबिळ यांच्या मालकीची स्कार्पिओ गाडी भाड्याने घेऊन आले होते. त्या गाडीवर राजेश कदम चालक होता. रविवारी ते कुणकेश्वर येथे फिरून आले व सायंकाळी ते देवगड बीच पवनचक्की गार्डन येथे फिरण्यासाठी जात होते.या अपघातात रिक्षाचालक अक्षय किर याच्या डोक्याला उजव्या हाताला डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर श्लोक याला मुका मार लागला तर आदिशच्या डोक्याला , डाव्या डोळ्याच्या वरती दुखापत झाली आहे. त्याच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. रिक्षाचालक किर यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पुढे हलविण्यात आले. ठाणे बदलापूर येथे रेल्वेमध्ये नोकरीला असलेले या अपघातात मृत झालेले राजेश शेडगे हे १७ मे रोजी गावात वार्षिक गोंधळाचा कार्यक्रम असल्याने सकाळीच ठाणे बदलापूर येथून गावी आले होते.

स्कार्पिओतील चालकाला सायंकाळी साडेसात वाजता पोलीस हे .कॉ. प्रवीण सावंत यांनी त्याचे मोबाईल लोकेशन वरून घाडणीचे पाणी या ठिकाणाहून ताब्यात घेतले. अपघातातील रिक्षामधील प्रवासी हे कट्टा गावातील असल्याने सर्व कट्टा ग्रामस्थ यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. कट्टा तिठया नजीक असलेल्या रघुवीर चौगुले यांच्या घरासमोरील धोकादायक वळणावर कायम अपघात होत असून यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. या वळणावर गतिरोधक दोन्ही बाजूने बसविण्यात यावे. तसेच वळणावर आंबा कलम असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही व त्यामुळे अपघात होतात. हे कलम तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी कट्टा ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ कोंयडे व ग्रामस्थ यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!