कणकवली : खारेपाटण बाजारपेठमधील हार्डवेअर दुकानात साहित्य खरेदीच्या बहाण्याने जात काउंटर मधील ८८ हजार ४०० रुपयाची रक्कम लांबविणाऱ्या दोन संशयित महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तुलसी सतीश बडगुजर (३०) व शोभा लालसिंग चव्हाण (५४, दोन्ही रा. पुणे, हडपसर) अशी त्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांना अटक करून गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता १२ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
या चोरीबाबतची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात संबंधित दुकानाच्या मालकाने दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत तळेरे बाजारपेठ येथून त्या संशयित दोन महिलांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. खारेपाटण बाजारपेठेतील स्नेहा सचिन सप्रे याच्या हार्डवेअर दुकानात मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्या संशयित महिला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान स्नेहा सप्रे या त्यातील एका महिलेला साहित्य दाखवत असताना त्यातील एक महिला काउंटरजवळ उभी होती. तीच संधी साधून काउंटर जवळ उभ्या असलेल्या संशयित महिलेने दुकानाच्या काउंटरखालील लॅपटॉपच्या बॅगेतील ८८ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली आणि तेथून पोबारा केला.
हा प्रकार सप्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरीप्रकरणाची कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस त्या संशयित महिलांचा परिसरात शोध घेत होते. त्यादरम्यान तळेरे परिसरात दोन महिला संशयितरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित तुलसी बडगुजर व शोभा चव्हाण यांना अटक केली. त्यानंतर त्या महिलांना पोलिस ठाण्यात हजर करून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरीस गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, उद्धव साबळे, पराग मोहिते यांनी केली.