मालवण : एसटी महामंडळातर्फे महिला, ज्येष्ठांसाठी सुरू असलेल्या योजनांमुळे गाड्यांचे भारमान वाढले आहे. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे. आता उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने ग्रामीण व लांबपल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांचे भारमान आणखी वाढले आहे. वाढत्या भारमानामुळे आणखी गाड्यांची आवश्यकता भासणार आहे.
शासनाने महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात १०० टक्के सवलत योजना सुरू केली आहे. त्यामुळे एसटीच्या भारमानात वाढ झाली आहे.
गर्दीमुळे साध्या गाडीतून एकावेळी ७० ते ७५ सीट प्रवासी भरून वाहतूक केली जाते. एसटीच्या भारमान क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक सुरू असून उन्हाळी सुट्यांमुळे गाड्यांची कमतरता भासू लागली आहे. बंद केलेल्या शालेय फेऱ्या जादा फेऱ्यांकडे वळविल्या आहेत. सध्या महिलावर्ग मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रवास करतात. त्यामुळे ग्रामीण भागात गाड्यांची कमतरता भासते.