कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यात जिल्हा बँक केंद्रस्थानी आहे. अनेकांना कर्जाचे आमिष, जप्तीच्या धमक्या देणे सुरु असून जिल्हा बँक व सोसायट्यांमध्ये राजकीय बैठका घेतल्या जात आहेत. जिल्हा बँकेचा पैसा निवडणुकीसाठी वापरला जात आहे. बँकेच्या सभासदांना विविध प्रलोभणे दिली जात आहेत. हे प्रकार निवडणूक आयोगाने वेळीच थांबवले नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे नेते अतुल रावराणे यांनी दिला.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गेल्या 35 वर्षांत विविध मंत्रीपदे भूषिवली आणि स्वतःचा भले करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले. नारायण राणे हे निवडून यावेत म्हणून नीतेश राणे यांच्याकडून मतदारांवर राजकीय दबाव टाकला जात असून काही मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कणकवली येथील मविआच्या प्रचार कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. रावराणे बोलत होते. रावराणे म्हणाले, वैभववाडी, देवगड तालुक्यात रस्त्यांची कामांची टेंडर न काढताच आमदार नीतेश राणे यांच्या शिफारशीने ठेकेदार कामे करीत आहेत. तसेच सताधारी पक्षाकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून मतदारांना प्रलोभणे दिली जात आहेत. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्याचे रावराणे सांगून निवडणूक आयोगाने जिल्ह्यात निरपेक्षपणे मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शुक्रवारी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी जनसमुदाय कणकवलीत येणार आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. तोच वारसा पुढे नेण्याचे काम खासदार विनायक राऊत करीत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ असल्याने विनायक राऊत यांना मतदार भरघोस मतदान करणार असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अडिच लाखांनी पराभव करून राणेंचे पुस्तक कायम बंद करतील, असा दावा त्यांनी केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उद्योजक किरण सामंत यांनी नारायण राणेंनी फसविले आहे. त्यामुळे त्यांनी आपले बंधू उदय सामंत यांचे कार्यालयावरून फोटो हटविले आहे. त्यावरून ते नाराज आहेत, त्यांच्या नाराजीचा फायदा विनायक राऊत यांना होईल, असा विश्वास रावराणे यांनी व्यक्त केला. नारायण राणेंनी 35 वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भले केले असते तर नीतेश राणे यांच्यावर मतदारांना दबाव टाकणे व त्यांना धमक्या देण्याची वेळ आली नसती, असा टोला रावराणे यांनी लगावला.