सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ४४ वर्षांनंतर महायुतीच्या नेत्यांनी भाजपला कमळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. याबाबत नेत्यांचे मी आभार मानतो. या मतदार संघातून ना. नारायण राणेंना अडीच लाखांच्या मताधिक्यांनं निवडून आणणार, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कणकवली येथे बोलताना व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गुरुवारचा दिवस भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी आनंददायी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांच्या शुभेच्छा भाजपच्या पाठिशी होत्या आणि आजही आहेत. या मतदार संघातून कमळ चिन्हावर महायुतीच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची असलेली मनोकामना पूर्ण झाली आहे. महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४४ वर्षांनी या मतदारसंघातून भाजपला कमळ चिन्हावर ही निवडणूक लढविण्याची संधी दिली. मागील काही दिवस या मतदार संघातील उमेदवारीचा गुंता कायम होता. मात्र, मंत्री दीपक केसकर, उदय सामंत यांनी सामंजस्याची भूमिका दाखवली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मागील लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये सेना-भाजपची युती असल्याने या मतदारसंघातून विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आले होते, त्याचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका त्यांनी केली.