सावंतवाडी : शहरात आज पाच दिवसांची रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत मौजमजा सुरू होती. येथील चितारआळी मंडळाकडून खास तयार करण्यात आलेल्या “रेन डान्सची” सोय आकर्षण ठरली. रंगपंचमीच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डिजे, ढोल-ताशाच्या तालावर अबालवृद्ध थिरकताना पहायला मिळाले. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी युवक-युवतींनी रंगपंचमी साजरी करत रंगपंचमीचा आनंद लुटला. नैसर्गिक रंगांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला.
जयप्रकाश चौक, सालईवाडा, वैश्यवाडा, चिताराळी, उभाबाजार, माठेवाडा, सबनिसवाडा, खासकीलवाडा आदी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. डिजेच्या तालावर थिरकत युवाईन रंगाची उधळण केली. काही ठिकाणी रेन डान्स करण्यात आले. देव इसवटी महापुरुष मंदिर सबनिसवाडा येथील रोंबाट सालाबादप्रमाणे होळीचा खुंट येथे दाखल होत आरती केली. रंगात नहालेली युवाई सायंकाळी मोती तलावाच्या काठावरून गाड्यांवरून फेरफटका मारताना दिसली. रंगपंचमी निमित्त संपूर्ण सावंतवाडी रंगात नाहून गेली होती. पोलिसांनी देखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली होती.