फोंडाघाट : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये तृतीय वर्ष कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ पार पडला. सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री महेश सावंत उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंदर नारे यांनी केले. तर मान्यवरांची ओळख प्रा. विनोद पाटील यांनी करून दिली.
सुरुवातीला तृतीय वर्षाचे विद्यार्थी आयुष सावंत, सुचिता कदम, शुभम लाड यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सदिच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, आजचा दिवस हा कभी खुशी कभी गम असा असतो. विद्यार्थ्यांनी आपली प्रगती स्वतः साधली पाहिजे. त्यासाठी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. उच्च शिक्षण म्हणजे फक्त एम ए, एम कॉम नव्हे तर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. त्याचे शिक्षण घेतले पाहिजे. ज्यामुळे आपले उज्वल भविष्य घडेल. आपले उच्च विचार हे उच्च शिक्षणातून येतात हे निश्चित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
त्यानंतर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. यशवंत मोदी म्हणाले की, आपले पारंपरिक जीवन बदलण्याची आवश्यकता आहे. पुढचे आयुष्य हे वास्तवाशी निगडित असते. आत्तापर्यंतच्या चुका ह्या स्वीकारल्या जातात. परंतु यापुढे चुकीला माफी नाही. जीवनात असणारे समायोजन महत्त्वाचे असते. दुसऱ्याला समजून घेण्याची आवश्यकता असते. दुसऱ्याबद्दलची सहानुभूती तुमच्या जीवनातला समजूतदारपणा वाढवते, असे प्रतिपादन केले.
संस्थेचे संचालक श्री. रंजन नेरूरकर म्हणाले की, आजच्या दिवशी आपण जसे नटून थटून आला आहात, तसेच दैनंदिन जीवनातही नेहमी स्वच्छ वागा. त्यामुळे तुमचे विचार स्वच्छ राहतात. त्यामुळे जीवनाच्या बाजारात आपली किंमत वाढते. आपल्या जीवनात अनेक संकटे येतात. ज्याच्या जीवनात संकट जास्त, त्याने ओळखायचे आपण योग्य मार्गावर आहोत. सर्व सुख सुविधा मिळाल्यानंतर मोठे होता येते असे नाही. संघर्ष हाच यशाचा मंत्र असतो. पैसा मिळवणे हेच फक्त यश नाही, तर संस्कारक्षम जीवन म्हणजे यश, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना संस्थेचे चेअरमन श्री. महेश सावंत म्हणाले की, या महाविद्यालयातून बाहेर पडताना भविष्याचा वेध घेऊन बाहेर पडा. आपणाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची काळजी घेणे, हे आमचे परम कर्तव्य आहे. आपण उच्चशिक्षित झालो तर समाज उच्चशिक्षित होणार आहे. या संस्थेत काम करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचा आमचा दृष्टिकोन असतो. ती संधी तुमच्या उच्च शिक्षणातून आम्हाला द्या. आपण शिकलेल्या संस्काराचा उपयोग जीवनात करा, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिया मेस्त्री हिने तर सूत्रसंचालन नीता धुरी हिने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.