18.1 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे – जिल्हाधिकारी अनिल पाटील

कणकवली : शासन म्हणून काम करत असताना ग्राहकांसाठी खूप कायदे अमलात आले आहेत. सर्व नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार माहिती आहे. मात्र कर्तव्य माहिती आहे की नाही हे पडताळ पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेसाठी असलेल्या योजनांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आपण सेवा घेताना ती पार पाडतो की नाही हे देखील पाहिले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिकार व कर्तव्ये प्राप्त झाली आहेत. ग्राहक आपल्या अधिकारांना महत्त्व देतो. आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. ग्राहक दिन हा एका दिवसाचा इव्हेंट न होता, ग्राहक चळवळ बनली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.

यावेळी ते कणकवली कॉलेजच्या एसपीसीएल हॉलमध्ये जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर म्हणाले, सिंधुदुर्गातील जनता ही सुज्ञ आहे. त्यांना आपले हक्क व अधिकार माहिती आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना अधिकारी व कतव्ये दिली आहेत. याची माहिती प्रत्येक ग्राहकाला असली पाहिजे. आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. ग्राहकांनी आपल्या अधिकार व हक्कांचा योग्यरीत्या वापर केला पाहिजे. ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे काम शासन व प्रशासन करीत असले तरी ग्राहकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी तळागाळात जनजागृती होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात प्रोफेशनल काळात काम करताना आलेले अनुभव खेबुडकर यांनी शेअर केले. एस. एन. पाटील यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी केले. ते म्हणाले, ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण यांच्या समर्थनाच्या गरजेची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. या दिवसाचे आयोजन ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून, ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते. या दिवसाचा इतिहास १९६२ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी त्यांच्या भाषणात ग्राहकांच्या हक्कांवर बल दिल्यापासून सुरू झाला, असे श्री. कातकर म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई, कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, ग्राहक मंच अध्यक्ष श्रद्धा कदम, पोलीस ठाणे सिंधुदुर्गनगरीचे प्रथमेश गावडे, भारतीय मानक ब्युरोचे पुष्पेंद्र मेस्त्री, आदी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर ग्राहक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्वागत दीक्षांत देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष नागावकर यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!