पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची कामगिरी
कणकवली : शहरातील महामार्गालगत असलेले जय भवानी मोबाईल दुकान १ मार्चला अज्ञाताने फोडले होते. यात दुकानातील ४५ हजाराची रोकड लंपास झाली होती. या चोरीचा चोवीस तासात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी छडा लावला. यात रोकड चोरणारा दुसरा मोबाईल विक्रेताच निघाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कणकवली शहरात मुंबई गोवा महामार्गालगत शांतीलाल पदमाजी यांचे मोबाईल दुकान आहे. १ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता ते दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच आतील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ४५ हजार रूपयांची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची तक्रार त्याच दिवशी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केला. यात त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सुरवातीला त्याने या चोरी प्रकरणात हात वर केले. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच चोरलेली सर्व ४५ हजार रूपयांची रोकडही पोलिसांच्या ताब्यात दिली. मोबाईल विक्री व्यावसायात कर्जबाजारी झाल्याने आपण अन्य मोबाईल दुकान फोडल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान ज्या दुकानात चोरी झाली आणि ज्याने चोरी केली ते दोन्ही दुकान व्यावसायिक एकाच राजस्थानमधील एकाच गावातील आहेत.