मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने राज्यातील महिलांना विशेष गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला असून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी थेट लाभार्थीच्या खात्यात जमा केला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्च अखेरीस देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिले.
‘लाडकी बहीण’ योजनेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे की, मोठ्या प्रमाणावर महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल. कारण अर्थव्यवस्थेवर ताण येणार असल्याने सरकार ही योजना बंद करेल.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्व संध्येलाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजना तसेच इतर कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आदिती तटकरे यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्चला थेट खात्यात जमा केला जाईल आणि मार्चचा हप्ता मार्च अखेरीस मिळेल. त्यातही ही योजना पुढेही सुरूच राहणार असून, आतापर्यंत सुमारे २ कोटी ४० लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
खरेतर विरोधकांना या योजनेच्या यशामुळे नैराश्य आले असून, ते निराधार आरोप करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नागपूरमधील महिलांनी पतसंस्था स्थापन करून सक्षमीकरणाचा एक चांगला पर्याय महिलांसमोर ठेवला आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.