अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून
सुडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत – जिल्हाध्यक्ष अमित सामंत
कणकवली : कणकवली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून प्रेरीत असून सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी असले उपद्व्याप प्रशासनाला हाताशी धरून केले जात आहेत, अशा प्रकारच्या सुडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत, असा इशारा देत आतापर्यंत ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून वजनदार नेत्यांना त्रास दिले जात होते. आता पोलीस व महसूल यंत्रणेला हाताशी धरून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेठीस धरून विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही, देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात सर्व विभागांवर फक्त आणि फक्त आपलीच हूकूमशाही हूकमत प्रस्थापित करण्यासाठीच हे उपद्व्याप सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहेत, सत्ताधारी पक्षाने एक लक्षात ठेवावे, सत्ता ही कुणालाही अजरामर नाही, सत्ता ही संगीत खुर्चीचा खेळ आहे आज जे सूपात आहेत ते कधीतरी जात्यात जाणार आणि भरडले जाणार, हे लक्षात ठेवावे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक हद्दपारीचे प्रस्ताव पोलीसांकडून प्रांताधिकारी यांचेकडे प्रस्तावित केलेले आहेत, त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या सत्ताधारी पक्षांच्या पण व्यक्ती आहेत, त्यानं अभय का? यांची संपूर्ण माहिती आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत, कणकवली पोलीस निरीक्षक जगताप हे सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेच सत्ताधारी पक्षाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना संरक्षण देऊन, विरोधी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर विनाकारण राजकीय हेतूने कणकवली पोलीस निरीक्षक व कणकवली प्रांत यांच्या मार्फत कारवाईचा बडगा उचलला जात आहे. सत्ताधारी पक्षाने पोलीस व महसूल यंत्रणेला हाताशी धरून विरोधी पक्ष संपविण्याचा कितीही प्रयत्न केले तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्या कारवायांना भीक घालणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहून अशा राजकीय प्रेरीत घटनांच्या विरोधात लढा देऊ. पण हार पत्करणार नाही. अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाई विरोधात सक्षम न्यायालयात आम्ही दाद मागणार असून पिळणकर यांना सर्वतोपरी सहकार्य पक्षाच्या माध्यमातून केले जाईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने आतापर्यंत प्रस्तावित केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांचा लेखाजोखा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार, असल्याचे स्पष्ट करून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे किती हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रस्तावित केले. त्यातील किती प्रस्ताव मंजूर केले किती नामंजूर केले आणि प्रलंबित किती आहेत याची यादी नावासह जाहीर करावी. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शरदश्चद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे,