राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी
युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई
कणकवली ; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर (रा. नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट ता. कणकवली) या दोघांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश कणकवली उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी बजावले आहेत. 25 फेब्रुवारी 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 असा हद्दपारीचा कालावधी असणार आहे.
नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट येथे वास्तव्यास असलेले अनंत गंगाराम पिळणकर व देवेंद्र अनिल पिळणकर याच्या विरूद्ध पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस ठाणे यांनी दाखल केलेला हद्दपारीचा प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थलसिमेतुन आदेशाचे दिनांकापासून चार दिवसाच्या कालावधीनंतर एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार करणेत येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सदर आदेश यांना प्राप्त झालेपासुन एक वर्षाच्या कालावधीसाठी 25/02/2025 पासून ते 24/02/2026 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कणकवली किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेखी परवानगी शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थलसिमेत प्रवेश करण्यास किंवा वास्तव्य करण्यास मनाई असणार आहे.
सदर कालावधीत ते ज्या पोलीस ठाणे क्षेत्राच्या हद्दीत वास्तव्य करणार आहे त्याचा पूर्ण पत्ता त्या पोलीस ठाणे अधिकारी यांना देऊन साप्ताहीक कालावधीत त्या पोलिस ठाण्यात हजेरी लावावी व कणकवली पोलीस ठाणे येथेही वास्तव्याचा पत्ता कळवावा.अशी अट घातली आहे.