कुडाळ : येथील श्री संत राऊळ महाराज महाविद्यालयात आज डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्पला सुरुवात झाली. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कुल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने ५ दिवस चालणाऱ्या या निवासी कॅम्पचं उदघाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जलदान करून झालं. या कॅम्पमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे आणि दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्गसह राज्याच्या ९ जिल्ह्यातल्या ३७ शाळेतले हे विद्यार्थी आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यक शास्त्रातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्पायर कॅम्पचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी पहिल्यांदाच सिंधुदुर्गला हा सन्मान मिळाला असून सिंधुदुर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. डॉ. अरविंद नातू यांच्यासारखे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे अर्थात आयसरचे अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ तसेच भाभा ऑटोमिक सेंटरचे डॉ. विवेक पारकर, तसेच डॉ. सोलापूरकर, डॉ. अशोक रूपनेर असे देशभरातले आघाडीचे संशोधक या विद्यार्थ्यंना मार्गदर्शन करणार आहेत. या इन्स्पायर कॅम्प विषयी बीएआरसीचे संशोधक डॉ. विवेक पारकर यांनी माहिती दिली. पाच दिवसीय शिबिरात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि अर्थ सायन्स या विषयावर व्याख्यान संवाद तसेच हॅन्ड्स ऑन ऍक्टिव्हिटी आणि प्रयोग, प्रश्नमंजुषा, चर्चासत्र यांचा समावेश असेल. हे शिबिर निवासी असून विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे या शुभारंभ सोहळ्याला भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे अर्थात आयसरचे डॉ अरविंद नातू, जिल्हाधिकारी अनिल पाटील, बीएआरसीचे डॉ. विवेक पारकर, कामशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, तहसीलदार वीरसिंग वसावे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, कॅम्पच्या समन्वयक डॉ. योगेश कोळी उपस्थित होते. या कॅम्प मधून सामान्य लोकांचे जीवन सुखकारक करणारे शिक्षण घेऊन हे विद्यार्थीं बाहेर पडतील असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, डॉ. अरविंद नातू, अरविंद शिरसाट यांनी बोलताना व्यक्त केला. संत राऊळ महाराज महाविद्यालयात या कॅम्पच्या आयोजनाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. राज्यातल्या नऊ जिल्ह्यातले २०० विद्यार्थी या कॅम्प मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांची नोंदणी महाविद्यलायच्या गेटवरच करण्यात आली त्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मोलाच सहकार्य केलं. शुभारंभ कार्यक्रमात उपस्थितांचं स्वागत प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे आणि डॉ. योगेश कोळी यांनी केलं. प्रास्ताविक डॉ. स्मिता सुरवसे यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. ठाकूर यांनी केलं. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. .