सिंधुदुर्गनगरी : गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी ३३ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक व कार्यालय अधीक्षक अशा दोघांना आज लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई आज करण्यात आली. माणिक भानुदास सांगळे आणि उर्मिला महादेव यादव अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी यातील तक्रारदार यांचे श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता ५० हजार रुपये रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार १० जानेवारीला प्राप्त झाली होती. १६ जानेवारीला पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये ४० हजार रुपये लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.