कणकवली सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंती
ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन
कणकवली ( मयुर ठाकूर ) : कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी पूजा मंडपात गणपती बाप्पा मोरया ….अशा घोषणा देत श्री गणेश मूर्ती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली.
यावेळी यावेळी पंकज पेडणेकर, संजय कामतेकर, निखिल आचरेकर, मधुकर सावंत, राजू चिंदरकर, अरुण जोगळे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, दुपारी ३.३० वाजल्यापासून सुस्वर भजने होतील. यामध्ये श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, जानवली, बुवा रवी राणे, मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवे, बुवा अमेय आर्डेकर, राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ जानवली, बुवा उदय राणे, गांगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ डामरे, बुवा चिन्मय सावंत, आई जयंतीदेवी भजन मंडळ पळसंब, बुवा अनिल परब यांचा समावेश आहे. रात्री ८.३० वाजता महाआरती होईल, रात्री ९.३० वाजता ओमकार दशावतार नाट्य मंडळाचे ‘गंधर्व उद्धार’ नाटक होणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे.या माघी गणेश जयंती उत्सवामुळे कणकवली शहरात उत्साहाचे वातावरण आहे.