कणकवली : शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या संशयावरून संबंधित गुन्ह्यात कणकवली बसस्थानकासमोरील लॉजचा व्यवस्थापक ओंकार विजय भावे (३२, रा. कळसुली, ता. कणकवली) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी ओंकार भावे याला अटक केली होती. ही कारवाई जानवली पुलानजीक सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली होती. त्याला पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. ती मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केलेल्या लॉज मालक संजय सांडव याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.