वैभववाडी – शहरातील भारत पेट्रोल पंपनजिक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ३० ते ४० वयोगटातील तरुणाचा नेमका अपघात झालाय की घातपात अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्या तरुणाच्या टीशर्टवर इसबा देवी असे लिहिलेले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. सकाळी पेट्रोल पंपाच्या मालक श्रीमती रावराणे यांच्या ही घटना निदर्शनतात आल्यानंतर पोलिसांना याबाबतची खबर दिली.
घटना समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, अजित पडवळ, हरीश जायभाय, जितेंद्र कोलते, अभिजीत तावडे, अजय बिलपे, समीर तांबे यांनी घटना स्थळी धाव घेत पहाणी केल्यानंतर पंचनामा केला. पोलिसांना ओळखीचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. वैभववाडी नगरपंचयातीच्या सिसिटीव्हीच्या आधारे त्या व्यक्तीचा अपघात झाला आहे का हेही तपासले जात आहे. आद्यपही मृतदेहाची ओळख पटली नसल्याने हा अपघात की घातपात असा पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. देवगड येथील इसबा देवी असल्याचे समजते. हा तरुण देवगड येथील आहे का ? त्या दृष्टीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल ओळख पटविण्यासाठी चौकशी करित आहेत. हा तरुण काल वैभववाडी बाजारपेठ येथे फिरत असल्याचीही चर्चा आहे.