नंदुरबार : मकर संक्रांतीच्या पतंगोत्सव दरम्यान नायलॉन मांजामुळे नंदुरबार शहरातील एका सात वर्ष निष्ठा बालकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच १५ जानेवारी रोजी मिरची पथारीवर कामाला जाणाऱ्या एका युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्याची घटना घडली आहे. या मांजामुळे आती रक्तवाहिनीला चीर पडली आहे. मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याने त्यास जीवनदान मिळाले. मात्र त्याला १०० पेक्षा अधिक टाके पडले आहेत.
मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे कार्तिक गोरवे या सात वर्षीय निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच नंदुरबार व नवापूर येथेही नायलॉन मांजामुळे तीन ते चार जण जखमी झाले होते.ही ताजी घटना असताना नंदुरबार शहरातील एल.के.नगर, जगतापवाडी येथे राहणाऱ्या सुरज युवराज सुळ (वय २३) हा युवक बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुचकीने घरून मिरची पथारीवर कामासाठी निघाला. काही अंतरावर असलेल्या उड्डाण पुलावर पोहोचताच नायलॉन मांजाच्या दोऱ्याने त्याच्या गळ्याचा फास आवळला. त्यात गंभीर जखमी झाल्याने तो जागीच कोसळला. त्या ठिकाणाहून कर्तव्यावर जात असलेल्या पोलिसांनी तात्काळ सुरजला खाजगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने त्याची तपासणी करून शस्रक्रिया केली. श्वसननलिका, रक्तवाहिनी फाटल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. वैद्यकीय पथकाने तातडीने शास्रक्रिया केल्याने तरुणाचा जीव वाचला. या तरुणावर १०० पेक्षा अधिक टाके टाकण्यात आले. अतिदक्षता विभागात ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीत युवकावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या टीमने रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
नायलॉन मांजामुळे महिला जखमी
नंदुरबार शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण जायबंदी झालेत. मंगळवारी सायंकाळी देखील किलबीत हॉस्पिटल परिसरातून संध्याकाळी फिरणाऱ्या संगीताबाई भगवान मराठे (वय ५४) या महिलेच्या पायात नायलॉन मांजा अडकल्यामुळे ती जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलेच्या पायाला १५ टाके देण्यात आले आहे.