मालवण : देवगड येथील समुद्रात अवैधरीत्या एलईडी द्वारे मासेमारी करणारा एक ट्रॉलर येथील मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्तीनौकेने काल रात्री पकडला. हा ट्रॉलर येथील सर्जेकोट बंदरात आणून जप्त करण्यात आला आहे. या ट्रॉलर वरील जनरेटर, लाईट तसेच अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. संबंधित नौका मालकाविरोधात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्या न्यायालयात प्रतिवेदन सादर करण्यात येणार आहे अशी माहिती परवानाधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली. सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात गेल्या काही महिन्यात मलपी कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलरसह एलईडी द्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांनी धुडगूस घातला आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यात काल रात्री देवगड येथील समुद्रात गस्त घालत असताना येथील मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्तीनौकेस चांदणी १ नोंदणी क्रमांक आयएनडी एम एच -५ एमएम ७५८ हा एलईडी ट्रॉलर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना दिसून आला. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेवरील परवाना तथा अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर पोलीस कर्मचारी संकेत तांडेल दीपेश मायबा सागर परब यांच्या सहकार्याने हा ट्रॉलर पकडला. या ट्रॉलरवर तांडेल सह दोन खलाशी होते. हा ट्रॉलर जप्त करत सर्जेकोट येथील बंदरात आणण्यात आला. या ट्रॉलरवर कोणतीही मासळी आढळून आली नाही. मात्र ट्रॉलर मध्ये असलेले लाईट, लाईट पुरविणारे उपकरणे असे सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे अशी माहिती श्री. भालेकर यांनी दिली. या ट्रॉलरवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून संबंधित नौका मालकाविरोधात प्रतिवेदन सादर केले जाणार असून त्याची सुनावणी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्यासमोर होणार आहे अशी माहिती श्री. भालेकर यांनी दिली.