विमानतळाला कुलूप मारून दाखवा ; घराला कुलूप लावले नाहीतर नाव सांगणार नाही
खा. नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड इशारा
कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवाचा थाटात समारोप झाला. टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना एकदा प्रत्यक्ष पहावे यासारखा दुसरा आनंद नाही. माझ्या जिल्हावासीयांनी कलेचा आनंद लुटावा म्हणून सिंधु पर्यटन महोत्सव सुरू केला. पर्यटनातून आर्थिक समृद्धी सिंधुदुर्गात यावी, यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. सी वर्ल्ड होणार, वैभववाडी कोल्हापूर ट्रेन होणार. प्रत्येक घरात रोजगार देणार हा माझा निर्धार आहे. दोडामार्ग मध्ये १२०० एकर मध्ये हजारो कारखाने उभारण्याचा संकल्प आहे. १९९० पासून मागील ३५ वर्षात अनेक अनुभव घेतले. घर जाळतानाही आंनद वाटला. खोटे आरोप करतानाही आनंद वाटला. मला वाटलेलं माझं गाव आहे. माझ्या जिल्ह्यातील माणसे चांगली असतील. पण काही वाईट अपवाद आढळले.
जिल्ह्यात पाणी टंचाई संपवली. वाडी तिथे रस्ते आणले. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज च्या माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय केली. लाईफटाईम हॉस्पिटल आणले. वृद्धश्रम बनवला. चिपी विमानतळ आणला. मंत्री असताना विरोधकांनी विमानतळाला विरोध केला. तांत्रिक मुद्द्याने बंद असलेले चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. काही विरोधक मीडियातून धमकी देतात की, चिपी विमानतळाला कुलूप ठोकणार . पोलिसांना सांगतो जर कोणी अशी धमकी देत असेल तर गुन्हे नोंदवा. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. टाळे मारूनच दाखव, नाही तुझ्या घराला टाळे मारले तर नारायण राणे नाव सांगणार नाही, असा इशाराच खासदार नारायण राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिला.
आता जर कोणी बोलला तर मी सोडणार नाही. घरात दारात येऊन उभा राहणार. पुढचे मला माहित नाही. कणकवली मतदारसंघातून ५९ हजारांच्या मताधिक्याने मंत्री ना. नितेश राणेंना विजयी केलात. तुमचे उपकार मंत्री ना. नितेश विसरणार नाही. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मंत्री ना. नितेश राणे करणार यात शंका नाही. साधी बालवाडी काढू शकले नाहीत ते आम्हाला मिडीयातून धमकी देतायत. अडीच वर्षे सत्ता असताना उबाठा सेनेने कायम तोडपाणी करण्यासाठी विरोध केला. आता सत्ता आमची आहे. मुख्यमंत्री असताना किंवा ३० वर्षे सत्तेत असतानाही कधी विरोधकांशी सुडबुद्धी ने वागलो नाही. राजकीय जीवनातील हे माझे हे ११ वे पद आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते खासदार पदे मिळाली, कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमावेळी खा. नारायण राणे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव ही संकल्पना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या प्रेरणेतून मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या सहकार्यातून कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित करत आहोत. मंत्री ना. नितेश राणे यांच्या आशीर्वादाने याहीपूढे मोठे कलाकार कणकवली पर्यटन महोत्सवात येतील, असा विश्वास श्री. नलावडे यांनी कणकवलीकरांना दिला.
यावेळी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गायक पवनदीप राजन आणि अरुनीता कांजीलाल, चेतना भारद्वाज यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.