छत्रपती शिवाजी महाराजांचा गीतातून उलगडला जीवनप्रवास
कणकवली: स्थानिक २५० कलाकारांचा सहभाग असलेला ‘कनकसंध्या’ कार्यक्रम खऱ्या अर्थाने रंगतदार ठरला.कोकणच्या संस्कृतीचे सार्थ दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडविण्यात आले.त्यामुळे हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणेच यादगार ठरला.
विविध गीतांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे विलोभनीय दृश्य कणकवली पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘कनकसंध्या’ या कार्यक्रमाच्यावेळी पाहायला मिळाले.
यावेळी रसिक भारावून गेले. तर यावेळी सादर झालेल्या नृत्य, नाट्य, संगीत, कॉमेडी अशा बहुरंगी कार्यक्रमाला टाळ्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.दिवाळी, हळदीकुंकू, कोकणातील शिमगाेत्सव, लग्नापूर्वीचा हळद समारंभ आणि प्रबोधनात्मक छोट्या नाटिका यामुळे वातावरण उत्साहपूर्ण बनले होते. मिलिंद गुरव आणि सहकारी यांनी ‘पुष्पाचं लगीन’ ही मालवणी विनोदी नाटिका सादर करीत उपस्थित रसिकांना पोट धरून हसविण्यास भाग पाडले. ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर आणि लोककलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांनी निर्मिती केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रधार संजय मालंडकर होते .हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांनीही मोठी गर्दी केली. सुहास वरुणकर यांनी गाऱ्हाणे घालून व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक संजय कामतेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
या कार्यक्रमात गुजराती, राजस्थानी, दक्षिण प्रांतातील तसेच कोकण प्रांतातील संस्कृती नृत्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील व अन्य प्रशालेमधील लहान मुलांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले. यावेळी माजी नगरसेवक किशोर राणे, बाबू गायकवाड,हनिफ पीरखान , राज नलावडे, राजा पाटकर, मनिष पेडणेकर,कंझ्यूमर्स सोसायटी अध्यक्ष संदीप नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य कणकवली येथील सिंधू गर्जना ढोल पथकाने केले.निलेश पवार ,श्रद्धा परब, रुपेश नेवगी, सावी मुद्राळे ,राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.
नृत्य दिग्दर्शक अरविंद वराडकर, समीर कांबळे, रियाज बँड,चिमणी पाखरं डान्स ग्रुप, दशावतार कलावंत बबलू मेस्त्री आणि त्यांचे सहकारी गायक कलावंत हनिफ पीरखान, रुचि रावराणे ,जोगेश राणे, खुशी आमडोसकर ,हरिभाऊ भिसे यांनीही चांगली भूमिका निभावली.
गायक कलावंत भूषण ,यश, संकेत, रोशन तांबे ,नृत्यांगना मृणाल सावंत ,गौरी कामत, मानसी मसुरकर, तनवी, अथर्वी ,सानवी, दीक्षा ग्रुप, लक्ष्मी शेट्टी ग्रुप वागदे डंगळवाडी ,शेतकरी नृत्य रवी कुडाळकर ,संजय कांबळे ,नृत्यदिग्दर्शक राहुल कदम, सर्वेश भिसे, नृत्य विशारद मृणाल सावंत यांनी सर्वांगसुंदर कलेचे प्रदर्शन केले. हनिफ पिरखान यांनी सादर केलेले’सोचेंगे तुम्हे प्यार करेके नही’ या गीताला रसिकांची दाद मिळाली.
प्रहसन मिलिंद गुरव आणि सहकारी यांनी तर मालवणी प्रहसन माऊली नगर ग्रुप यांनी केले.गायिका निधी कदम, रुपाली वरवडेकर यांनी रसिकांची मने जिंकली. गणपत घाणेकर, दत्ता कुळे, विनायक शेट्ये यांनी भूमिकेला न्याय दिला.प्रमोद तांबे व विलास खानोलकर यांच्या बतावणीने रंगत वाढली.त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.