मुंबई : माजी केंद्रीय मंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या नावाचा वापर करून एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घडना उघड झाली आहे. मुंबईतील एका महिलेची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेच्या मुलीला महाविद्यालयात ऍडमिशन देण्याचा विश्वास दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अंधेरीतील ५१ वर्षीय महिलेची या घटनेत फसवणूक झाली आहे. महिलेच्या मुलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिशन करून देतो, असा विश्वास दाखवून ४५ लाख रुपये उकळण्यात आले आहे. ही महिला एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून कामाला आहे. महिला त्यांच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होत्या. यावेळी त्यांची ओळख मेघना सातपुते, नीतेश पवार, राकेश गावडे आणि सावंत यांच्याशी झाली. या संशयितांनी आपण भाजप खासदार नारायण राणे यांचे नातेवाईक असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिशन करून देतो, असे आश्वासन दिले. अॅडमिशनच्या नावाखाली या संशयितांनी महिलेकडून टप्प्याटप्प्याने ४५ लाख रुपये उकळले. तसेच, काही बनावट कागदपत्रे देखील त्यांना दिली. मात्र, लाखो रुपये देऊनही मुलीचे महाविद्यालयात अॅडमिशन झाले नाही. त्यानंतर महिलेने चौघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कोणतेही उत्तर मिळाले नाही. अखेर महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसानी पुढील तपास सुरू केला आहे.