मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2 मुळे अल्लू अर्जूनच्या अडचणीत वाढ झाली आहे. हैदराबाद येथील चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जूनने हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अल्लूला पाहण्याच्या प्रयत्नात चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की झाली. याचं रुपांतर नंतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जूनला अटक करत कारवाई केली आहे. पोलिस कारवाई करण्यासाठी अल्लूच्या घरी पोहोचले तेव्हा तो हाफ पँटवर होता आणि त्याच्या पायात चप्पलही नव्हती. अशाच अवस्थेत पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली याचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अल्लु अर्जुनने मागितली होती माफी
पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जूनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच शोक व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.