युवासेना तालुका प्रमुख कणकवली उत्तम लोके यांनी डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन केली चर्चा
कणकवली : दारिस्ते गावातील नाटळ हायस्कूल येथे शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना नेहेमी ५ कि.मी. अंतर पायपीट करावे लागत आहे. मागील वर्षापर्यंत विदयार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता दारिस्ते गावातून एस.टी. ची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु चालू शैक्षणिक वर्षात बसफेरी बंद असल्याने विदयार्थ्यांना रोज १० कि.मी. येण्या – जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८:३९ वाजता दारिस्ते येथून बस ची व्यवस्था करावी व विदयार्थ्यांची होणारी परवड थांबवावी अशा आशयाचे निवेदन दारिस्ते चे सरपंच यांनी कणकवली आगारात देऊन लक्ष वेधले आहे. तर ही बाब लक्षात येताच युवासेना तालुका प्रमुख कणकवली उत्तम लोके यांनी डेपो मॅनेजर यांना जाब विचारला. तसेच सुरू असलेल्या बस गाड्यांपैकी कणकवली शिवडाव दारिस्ते ही बस सेवा सुरळीत आणि वेळेत सुरू करा अशी मागणी देखील केली.