कणकवली | मयुर ठाकूर : एचआयव्ही- एड्सबद्दलची गंभीरता खेडेगावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे; तरच एड्सचे संपूर्ण निर्मूलन होऊ शकते. सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी युवकांनी जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे. स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी केले.
कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, एकात्मिक समुपदेशन व चाचणी कक्ष, कणकवली आणि जागृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचआयव्ही – एड्स जनजागृती अभियान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. जागृती फाऊंडेशनमार्फत पथनाट्य सादर करून कणकवली कॉलेज ते कणकवली एसटी स्टँडपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली.
या सर्व अभियानाचे नियोजन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजु, सर्व विश्वस्त, सदस्य, प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. एम. एच. पाटील, सुनील ढोणुक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, प्रा. आदिती मालपेकर, प्रा. पूजा मुंज यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. किरण जगताप यांनी मानले.
प्रसंगी २३५ विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. डॉ. राजेश वर्धन म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून युवक-युवतींनी एचआयव्ही/एड्स निर्मूलनासाठी सोशल मीडियामधून जनजागृती करणे आवश्यक आहे. डॉ. राजेश पालव म्हणाले, एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक, सामाजिक संस्था व प्रशासनाचा सहभाग कौतुकास्पद आहे. यामुळे सामाजिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी मदत होईल.
प्रा. डॉ. सोमनाथ कदम म्हणाले, विद्यार्थी व सर्व नागरिकांनी ‘माझे आरोग्य माझा अधिकार’ हे ब्रीद लक्षात ठेवावे. स्वतःला सुरक्षित ठेवावे. कारण जो सावध तोच सुखी आहे. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉ. रिया पालव, अशोक नारकर आणि प्रशांत बुचडे उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत चित्रकला, पोस्टर आणि सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेमध्ये निशांत राणे, मोहित सुतार, किमया गोसावी, श्रेया कदम, तुषार मेस्त्री यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक आला.
पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये सायली मेस्त्री, अर्चना राठोड, साक्षी परब, अमिषा लाड, सारिका इंडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनात क्रमांक प्राप्त केले. तर सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेमध्ये धनंजय कांबळे, तनुजा सावंत, मनीष गिरकर, रोशन चव्हाण, साक्षी काढवे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.