कणकवली : आचरा येथून निपाणी येथे कत्तलीसाठी गुरे नेणारा ट्रक खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलिसांनी आज सकाळी साडे सहा वाजता पकडला. यावेळी चालक आणि क्लिनर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले तर क्लिनर फरार झाला. ट्रकमध्ये ९ बैल, ७ गाय आणि ३ वासरे होती. बजरंग दलाचे कार्यकर्ते कृष्णा विश्वनाथ धुळपनावर (वय २७), शुभम हिर्लेकर, कुंदन गोसावी (सर्व रा. कोलगाव, सावंतवाडी) यांनी आपल्या कारमधून ओरोस ते खारेपाटण पर्यंत या ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला होता. या दरम्यान ट्रकने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या कारला धडक देण्याचाही प्रयत्न केला. तर या ट्रकच्या पाठोपाठ असलेल्या काळ्या रंगाच्या सँन्ट्रो कारनेही हूल दिली होती.
सावंतवाडी येथून मुंबई गोवा महामार्गावरून गुरांची ट्रकमधून वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच बरजंग दलाचे कार्यकर्ते कृष्णा धुळपनावर आणि त्याच्या दोन मित्रांनी कार मधून ओरोस येथून गुरे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक के ए २५ बी १५०५ चा पाठलाग सुरू केला होता. या ट्रकला ओव्हरटेक करून नांदगाव येथे थांबून कृष्णा यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक फोंडाघाटच्या दिशेने निघून गेला. या ट्रकचा पाठलाग करत असताना ट्रक चालकाने बजरंग दल कार्यकर्त्यांची कार दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रकच्या मागे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅन्ट्रो कारनेही धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. खारेपाटण पोलिसांनी नाकबंदी करून चेकपोस्ट येथे गुरे घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेतला. यावेळी चालक आणि क्लिनर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात चालक आदमअली याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रूपेश नाव असलेला क्लिनर पळून जाण्यात यशस्वी ठरला.