8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

पस्तीस वर्षात राणेंची प्रॉपर्टी वाढली पण जनता गरीबच राहिली

संदेश पारकर : हरकुळ बुद्रूक येथे महाविकास आघाडीची बैठक

कणकवली, : पंचक्रोशीत कारखाने येतील, उद्योग येतील रोजगार निर्मिती होईल म्‍हणून गेली ३५ वर्षे मतदारांनी राणेंना साथ दिली. पण एकही उद्योग कणकवली मतदारसंघात आला नाही. या कालावधीत राणेंची प्रॉपर्टी कोट्यवधींनी वाढली तर जनता मात्र गरीब राहिली. त्‍यामुळे या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले.
तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूक येथे महाविकास आघाडीची प्रचार बैठक झाली. यात श्री.पारकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हरकुळ बुद्रूक सरपंच बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, फय्याज खान, नित्यानंद चिंदरकर, नासिर खान, जयबा कुरेशी, कमलेश नारकर, दिवाकर पारकर मोठ्या प्रमाणात हरकुळ बुद्रुक येथील नागरिक उपस्थित होते..
श्री.पारकर म्‍हणाले, कणकवली शहरालगत हरकूळ बुद्रूक गाव आहे. पण या गावात जाणारे रस्ते अजूनही खड्डेमय आहेत. हरकुळ गावाला मे महिन्यात चक्रीवादळाने तडाखा दिला. इथल्‍या शेकडो कुटुंबांच्या घराचे छप्पर उडाले. घरातील धान्य वाया गेले. पण शासनाकडून एक रूपयाचीही मदत आलेली नाही. आमदार नितेश राणे यांनीही त्‍याबाबत शासकीय पातळीवर पाठपुरावा केला नाही. त्‍यामुळे इथल्‍या आमदारांना इथल्‍या जनतेच्या समस्यांबाबत कोणतीही आस्था नाही हे स्पष्‍ट झाले आहे.
पारकर म्‍हणाले, पहिली तीस वर्षे नारायण राणे यांनी कणकवलीचे प्रतिनिधित्व केले. त्‍यानंतर नितेश राणे गेली दहा वर्षे आमदार आहेत. पण त्‍यांना विकासाचा एकही प्रकल्‍प पूर्ण करता आलेला नाही. हरकुळ बुद्रूक आणि कणकवली गावच्या सीमेवरील मोकळ्या माळरानावर एमआयडीसी प्रस्तावित होती. परंतु केंद्रात उद्योगमंत्री असूनही राणेंना एमआयडीसी आणता आली नाही. त्‍यांच्या मुलाने म्‍हणजेन नितेश राणे यांनी तर हरकुळ बुद्रूक गावच्या सिमेवरील जागा कचरा प्रकल्‍पासाठी खासगी कंपनीला दिली आहे. ही कंपनी बुडीत गेली. पण जागा त्‍याच कंपनीच्या नावे राहिली आहे.
ते म्‍हणाले, सर्व सत्तास्थाने उपभोगून देखील एकही विकासाचे काम न करणाऱ्या राणे कुटुंबाला आता घरी बसविण्याची वेळ आहे. कणकवली मतदारसंघाचे आमदार निष्क्रिय आहेत. विकासकामांपेक्षा धर्मामध्ये भांडणे लावण्यातच त्‍यांना अधिक स्वारस्य आहे. त्‍यामुळे आता परिवर्तन व्हायलाच हवे. अन्यथा राणेंची पुढची पिढी तुमच्यावर राज्‍य करणार आहे. त्‍यामुळे सर्वांनी परिवर्तनासाठी सज्‍ज व्हायला हवे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!