अनंत रावले यांचा आरोप, आंदोलनाचा इशारा
कणकवली : देवगड एसटी आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकांच्या कार्यपद्धतीमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने एसटी कष्टकरी कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असे एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष अनंत रावले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
देवगड आगारामध्ये विनंती बदली करून आलेले सहायक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी कार्यपद्धतीने सर्व कर्मचारी विशेषतः चालक वर्गाला प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. आगार व्यवस्थापक तसेच वाहतूक निरीक्षक व प्रभारी सहायक वाहतूक अधीक्षक यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनसुद्धा आगार पातळीवर निर्णय घेण्यात आले नाहीत. विविध संघटना यांनी तसे पत्र आगार व्यवस्थापक यांच्याकडे दिले, तरीही त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. कार्यालयाकडे लेखी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
तसेही विभागीय कार्यालयाचेसुद्धा काम सध्या विभागीय वाहतूक अधीक्षक करत आहे. विभाग नियंत्रक नाहीत आणि बाकी सर्व अधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे.
यावर योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईलच; परंतु अपघात झाला किंवा काही चुकीचे घडले तर त्याला प्रशासन जबाबदार राहील, असेही रावले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.