त्या” मालकावर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करावी ; नागरिकांची मागणी
कणकवली : तालुक्यातील हळवल गावात देवतळी स्टॉपनजिक असलेली एका डोंगराचे उत्खनन करून प्लॉट तयार करण्यात आले आहेत. मात्र सदरचा डोंगराळ भाग हा सध्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. मागील वर्षीपासून या ठिकाणी पावसाच्या दिवसांत डोंगराची माती वाहून रस्त्यावर येत आहे. काही वेळा या ठिकाणी अपघात झाले. या अपघातात काही जण जखमी झाले तर काहींच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकाराबाबत वृत्त प्रसिद्ध झाले की सदर जमीन मालक हा जेसीबीच्या सहाय्याने त्या ठिकाणची माती हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करतो. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी माती वाहून येऊन साचत असल्याने ही समस्या प्रलंबितच राहते. दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी माती आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्या कॉलेज ला जाणारा एक विद्यार्थी मोटारसायकल वरून घसरून त्या चिखलात पडला. तो मुलगा जखमी झालाच मात्र मोटरसायकलचे देखील मोठे नुकसान झाले. याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
यावेळी त्या जमीन ( प्लॉट ) मालकाने रस्त्यावरील माती बाजूला केली. आणि गटारात साचलेली माती काढून पुन्हा रस्त्याच्या बाजूला केली त्यामुळे ती माती पुन्हा कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर आली. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधीत जमीन ( प्लॉट ) मालकांवर कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या अपघातांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली जात आहे.