बांदा भाजपा पदाधिकाऱ्यांचा सार्वजनिक बांधकामला इशारा…
बांदा : बांदा-दाणोली मार्गावरील बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग ते गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला असून येत्या आठ दिवसात रस्ता वाहतुकीस योग्य न झाल्यास, रास्ता रोको करू, असा इशारा बांदा भाजपचे प्रशांत बांदेकर, गुरु कल्याणकर व हेमंत दाभोलकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम चे उप-कार्यकारी अभियंता सीमा गोवेकर व विजय चव्हाण यांची भेट घेऊन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, बांदा-दाणोली मार्गावरील बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग ते गणपती मंदिर पर्यंतचा संपूर्ण रस्ता हा खड्डेमय बनला असून वाहतूक करण्यास धोकादायक बनला आहे. तसेच दुचाकी वाहने चालवणे कठीण बनले आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. तसेच शाळकरी मुलांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे तसेच लोकांना मणक्याचे विकार होत आहेत. एवढी या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. स्थानिक लोकांना याचा प्रचंड त्रास होतो आहे. तरी आठ दिवसात हा रस्ता वाहतुकीस योग्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.