कणकवली : कणकवली शहराला जोडणारा व गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी होत असणारा कणकवली गणपती साना येथील जानवली नदीवरील दुहेरी वाहतुकीच्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, ८ कोटी रुपये मंजूर असलेल्या या पुलाच्या कामाचे लोकार्पण उद्या ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वाजता आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. तर याच वेळी अडीच कोटी रुपये मंजूर असलेल्या कणकवली गणपती साना येथील कृत्रिम बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या कामाचे देखील लोकार्पण यावेळी केले जाणार आहे. तसेच कणकवलीतील सोनगेवाडी येथील उद्यानाच्या लोकार्पणचा सोहळा देखील आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून ही विकासकामे कामे मार्गी लागली होती. याकरिता नगरपंचायत च्या सत्ता काळाच्या कालावधीत विशेष पाठपुरावा केला होता.
गणपती साना येथील दुहेरी वाहतुकीच्या पुलामुळे जानवली व कणकवली या दोन गावांना जोडणारा हा सेतू जनतेला फायदेशीर ठरत असून बारमाही वाहणाऱ्या धबधब्यामुळे कणकवलीच्या शहराला पर्यटन दृष्ट्या देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. तर सोनगेवाडीतील उद्यानाचे सुशोभीकरण झाले असून, येथील जनतेला हे उद्यान उद्या पासून खुले होणार आहे. ही विकासकामे लोकार्पण करून जनतेला दिलेला शब्द आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून पूर्ण केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. उद्या या कार्यक्रमांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सर्वांनी व कणकवली शहरवासीयांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.