आमदार नितेश राणेंनी घेतली दखल ; शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबणार
कणकवली : कणकवली सांडवेमार्गे बुधवळे ही ३:४५ वा. सुटणारी शालेय बस फेरी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आली होती. परंतु ही बस फेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे ही बसफेरी नियमित सुरू होण्यासाठी सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सरपंच ३ ऑक्टोबर रोजी कणकवली बस स्थानकामध्ये आंदोलनासाठी बसणार असल्याचे निवेदन कणकवली आगार व्यवस्थापक यांना सांडवे हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी दिले होते. बसफेरी पूर्ववत सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार देखील केलेला होता.
याबाबत वृत्त प्रसारीत होताच तातडीने कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दखल घेत सदर बंद असलेली बस फेरी सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बस फेरी सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार नितेश राणे यांच्या कार्यालयातुन देण्यात आली. त्यामुळे सर्वच प्रवासी, विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.