10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

बेंच अपहार प्रकरणी चौकशीसाठी ठाकरे शिवसेनेचे आत्मक्लेश आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे ; राणेंचे नाव घातल्यामुळे नाराजी 

सिंधुदुर्गनगरी : समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आलेल्या लोखंडी डेक्स बेंच मध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप करीत या अपहाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. दरम्यान वाटप करण्यात आलेल्या त्या बेंचवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता आमदार राणे यांचे नाव टाकण्यात आल्यामुळे उपस्थित आंदोलकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत समाज कल्याण विभागाच्यावतीने कणकवली विधानसभा मतदार संघात २५० दलित वस्तीसाठी २ हजार लोखंडी डेस्क बेंच वाटप करण्यात आले आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतची मागणी नसताना समाज कल्याण विभागाच्यावतीने आमदार नितेश राणेंच्या शिफारशी नुसार त्यासाठी अडीज कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र ३५०० किंमतीच्या असलेल्या लोखंडी डेस्क बेंचसाठी १२ हजार ५०० दाखवून प्रत्येक बेंचमागे ९ हजार रुपयांचा ज्यादा खर्च दाखवण्यात आलाआहे, त्यामुळे प्रत्येकी ९ हजार प्रमाणे सुमारे दीड कोटींचा भ्रष्टाचार लोखंडी डेस्क बेंच वाटपात करण्यात आला आहे. तसेच डेस्क बेंचवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता आमदार नितेश राणे यांचे नाव टाकण्यात आले असून हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. डेस्क बेंच हे पावडर कोटेड नाही त्यांना लगेच गंज पकडत असून दलित वस्तीत वगळून सार्वजनिक जागेत हे डेस्क बसवले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ तसेच बेंच वाटपातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आज उद्धवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करून सिंधुदुर्ग समाज कल्याण विभागाचे आयुक्त आणि सहआयुक्त यांचा देखील या भ्रष्टाचारात हात आहे. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,ज्या गावांमध्ये बेंच देण्यात आले आहेत ते दलित वस्ती मध्ये न बसविता इतरत्र बसविण्यात आले आहेत, त्यामुळे संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!